Sunday, June 11, 2006

भेट

भेट

बंद खोलीत आसवे काही
काजव्यांचे जणू थवे काही

भेट नव्हतीच ती, धुके होते
भेटले फक्त गारवे काही

बोललो, काय बोललो नाही
आठवे तू , न आठवे काही

दोन डोळ्यांमधील आकाशी
हिंडले मौनपारवे काही

तू न पुसलेस मी कसा आहे
अन् मलाही न बोलवे काही

मान वेळावली अशी तूही
शब्द सुचले मला नवे काही

काय हसलीस तू नकाराचे
वाटले की नको हवे काही

— चित्तरंजन भट

Saturday, May 27, 2006

तू नसताना

तू नसताना
तुझ्या सयींच्या
उधाण लाटा
चहुदिशांना

तू नसताना
उजाडलेल्या
भणंग वाटा
चहूदिशांना

तू नसताना
रित्या अंबरी
फिके चांदणे
चहूदिशांना

तू नसताना
तुझी आर्जवे
तुला शोधणे
चहूदिशांना!

(manogat)

Friday, May 05, 2006

Still Working on this Illustration....

Saturday, April 29, 2006

च्यायला मी काय खोटे बोलतोय काय!!!

च्यायला, प्रेम म्हणजे असतं काय,
खाली डोके वर पाय,
नुसताच गोंधळ, कल्लोळ सारा,
बोला मी खोटे बोलतोय काय!!!!

पण प्रेमात असं व्हावचं लागतं,
थोडसं हसावं अन थोडसं रडावंच लागतं,
धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं,
बोला मी खोटे बोलतोय काय!!!!

ती दिसली तरी त्रास,नाही दिसली तर दुप्पट वैताग,
आपल्याला मग काही सुचत नाही, मग ती आल्यावर चुप बसताच येत नाही.
बिचारी मान खाली घालुन शिव्या खाते, स्वतःची चुक मान्य करते,
खरतर तिला दुखवावेसे मला मुळीच वाटत नाही, पण तिचे अश्रु पिल्याशिवाय आपल्याला बरेच वाटत नाही.
अरे दोस्तहो, तुम्हाला काय वाटलं मी फ़ेकतो,
च्यायला !!!!
मी काय खोटे बोलतोय काय!!!

(manogat)

Tuesday, April 25, 2006

My Illustration

Sunday, April 23, 2006

हिंदू

माझे अवघे मी पण हिंदू
आयुष्याचा कणकण हिंदू,
ह्रदयामधले स्पंदन हिंदू
तन-मन हिंदू, जीवन हिंदू !

दरीदरीतिल वारे हिंदू
आकाशातिल तारे हिंदू,
इथली जमीन, माती हिंदू
सागर, सरिता गाती हिंदू !

धगधगणारी मशाल हिंदू
आकाशाहुन विशाल हिंदू,
सागरापरी अफाट हिंदू
हिमालयाहुन विराट हिंदू !

तलवारीचे पाते हिंदू
माणुसकीचे नाते हिंदू,
अन्यायावर प्रहार हिंदू
मानवतेचा विचार हिंदू !

महिला, बालक, जवान हिंदू
खेड्यामधला किसान हिंदू,
शहरांमधुनी फिरतो हिंदू
नसानसांतुन झरतो हिंदू !

प्रत्येकाची भाषा हिंदू
जात, धर्म अभिलाषा हिंदू
तुकाराम अन कबीर हिंदू
हरेक मस्जिद, मंदिर हिंदू !

इथला हरेक मानव हिंदू
अवघी जनता अभिनव हिंदू,
झंझावाती वादळ हिंदू
हिंदू हिंदू केवळ हिंदू !

शंभर कोटी ह्रदये हिंदू,
हजार कोटी स्वप्ने हिंदू,
असंख्य, अगणित ज्वलंत हिंदू
अखंड भारत, अनंत हिंदू !!!

-शतानंद.

Monday, April 17, 2006

पाहिले तुला हळूच

पाहिले तुला हळूच काल मी तिथे वळून
रुपमोगरा मनात दर्वळे तुझा अजून

ओतले मधाळ गोड रूप साजिरे तुझ्यात
चंद्र पाहता वरून लाजतो तुला बघून

आजकाल आसपास होतसे तुझाच भास
प्राण प्राण रोम रोम गातसे तुझीच धून

काढतो कसे बसे बरेच तास आफिसात
पाहतो तुझीच वाट त्याच स्थानका वरून

ये नको छळू अता तुझाच ध्यास लागला गं
तूच पाहिजे मला तुझाच रोग हा म्हणून

-tushar joshi