Thursday, March 30, 2006

पाहिले तुला हळूच..

पाहिले तुला हळूच काल मी तिथे वळून
रुपमोगरा मनात दर्वळे तुझा अजून

ओतले मधाळ गोड रूप साजिरे तुझ्यात
चंद्र पाहता वरून लाजतो तुला बघून

आजकाल आसपास होतसे तुझाच भास
प्राण प्राण रोम रोम गातसे तुझीच धून

काढतो कसे बसे बरेच तास आफिसात
पाहतो तुझीच वाट त्याच स्थानका वरून

ये नको छळू अता तुझाच ध्यास लागला गं
तूच पाहिजे मला तुझाच रोग हा म्हणून

तुषार जोशी, नागपूर

Wednesday, March 29, 2006

तू भले सांग जगाला !

तू भले सांग जगाला
तू कधी प्रेमच नाही केलंस

पण मी येईनच फिरून
तुझ्या प्रत्येक कवितेच्या

प्रत्येक ओळीच्याप्रत्येक शब्दातून
आणि करीन तुला अस्वस्थ, उदास,सुन्न, विषण्ण

खात्री आहे मलाजेव्हा होईल
अनावर तुलालपवून ठेवणं
तेव्हा तू करशीलच कबूल कधीतरी दोघांती
की प्रेम कधीतरी केलं होतंस तूही माझ्यावर

मग तू भले सांग जगाला
तू कधी प्रेमच नाही केलंस

(manogat)

Sunday, March 26, 2006

प्रेमावाचुन

प्रेमावाचुन दुसरे काहीमला कधीही जमले नाही
शहारलेल्या चाफ्यासाठीउन्हे जाहली तरणी-ताठी

फिरलो त्यांच्या पाठी पाठीतसे कुणीही जळले नाही
प्रेमावाचुन...भुलेन मादक सौंदर्यालाचुकेन कैसे कर्तव्याला

ज्याच्या हाती त्याचा प्यालाअजून काळीज भरले नाही
प्रेमावाचुन...वसंत येथे नाही रमलापाऊस नाच नाचला दमला

कसा एवढा ग्रीष्म बहरला ?(मला कुणी ओळखले नाही)
प्रेमावाचुन..

किती खेळ शब्दांचे केलेसगळे हसण्यावारी नेले
लळा लावला- निघून गेले -प्रेम! मला का कळले नाही?
प्रेमावाचुन...

-अ

Friday, March 24, 2006

My Illustration - Shivaji Maharaj

Illustration By - Anant (24th March 06)

Wednesday, March 22, 2006

गमभन - टंकलेखन सुविधा

या सुविधेत उपलब्ध असलेले पान आपण डाऊनलोड करून घ्यावे.
आंतरजालाशी संबंध असताना आणि नसतानाही आपण त्यातील मजकूराच्या जागी आपले लिखाण करू शकाल. त्याकाळापुरती पॉपाअप खिडक्यांना आडकाठी ठेऊ नये.
ते संग्रहित करण्यासाठी आपल्याला सद्ध्यातरी ते सिलेक्ट ऑल करून युनिकोड युक्त फाईल मध्ये डकवावे लागेल आणि मग ते संग्रहित होईल.

[ manogat ] [ नीलहंस-ॐकार जोशी ]

Tuesday, March 21, 2006

तूझा राग

आज तूला सान्गूनच टाकतो की रागावल्यावर तू सुन्दर दिसतेस ...
पण मला तेव्हाहि आवडतेस जेव्हा गालातल्या गलात गोड हसतेस....

(manogat)

REPLY : लग्नापूर्वी तुझे हसणे झेलायला मी खुशाल खिसा रिता करायचो
आता तू निर्व्याज हसली, पाकीट रिकामे ही खूण मी ओळखायचो
[ Hemant Patil ]

Wednesday, March 08, 2006

कविता म्हणजे कविता म्हणजे कविता असते..

कविता म्हणजे कविता म्हणजे कविता असते
शब्दांची ती अर्थपूर्ण लांबलचक माळ असते
भावनेच्या तेलात तळून शब्दांच्या बुडबुड्यातून
वर आलेली ती खुसखुशीत भजी असतात

विडंबनाच्या प्रदेशातून फ़िरणार्या त्या हरिणी असतात
सिरीयस सिंहांच्या वाटेतल्या त्या भक्ष्य असतात
तर कधी प्रसीध्द व्यक्तींच्या त्या सवल्या असतात
चुकून कधी शरीर मिळाले तर मातीचे ते पाय असतात
तात्विक जंजाळाच्या उजाड वाळवंटात तहानलेल्यांची ती आस असते

कविता म्हणजे कविता म्हणजे कविता असते
शब्दांची ती अर्थपूर्ण लांबलचक माळ असते.

हेमंत पाटील - सुरत

Tuesday, March 07, 2006

बग म्हणजे, बग म्हणजे, बग असतो...

बग म्हणजे, बग म्हणजे, बग असतो...
अचानक ठकविणारा महाभयंकर ठग असतो!!

जावाच्या सॉकेट प्रोग्रॅममध्ये लपून तो बसतो,
VB च्या लायब्ररीतून कुत्सितपणे तो हसतो,
प्रोजेक्ट ढासळवून टाकेल असा त्याचा रंग असतो,
कारण बग म्हणजे, बग म्हणजे, बग असतो...

अचानक ठकविणारा महाभयंकर ठग असतो!!
अनेकदा तो असूनही आहे असे वाटत नाही,
टेस्टरला जाणवतो पण कोडरला पटत नाही,

इम्लिमेंटेशनचा मात्र पूर्ण अपेक्षाभंग असतो,
कारण बग म्हणजे, बग म्हणजे, बग असतो...
अचानक ठकविणारा महाभयंकर ठग असतो!!

भयंकर बग अनेकदा खूप काळानंतर समजतो,
या अनपेक्षित हल्ल्यामुळे प्रत्येक इंजिनिअर थबकतो,
आणि मग प्रत्येकजण तो फिक्स करण्यात गुंग असतो,
कारण बग म्हणजे, बग म्हणजे, बग असतो...
अचानक ठकविणारा महाभयंकर ठग असतो!!

- चंद्रजीत (manogat)

Monday, March 06, 2006

रावसाहेब -- पु.ल.देशपांडे.

रावसाहेब पु.ल.देशपांडे.

"दिल्ले दान घेतले दान पुढच्या जन्मी मुस्सलमान" असा एक आमच्या लहानपणी चिडवाचिडवीचा मंत्र होता. दिल्ले दान परत घेणा~याने मुस्सलमानच कशाला व्हायला हवे ? दानतीचे दान काही धर्मावारी वाटलेले नाही. पण 'दाना'ला मुस्सलमानातल्या 'माना'चे यमक जुळते, एवढाच त्याचा अर्थ. पण दिल्ले दान कसलाही विचार न करता परत घेणारा देवाइतका मक्ख दाता आणि घेता दुसरा कोणीही नसेल.
एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये, ह्याला काही उत्तर नाही. पंधरा-पंधरा, वीस-वीस वर्षांच्या परिचयाची माणसे असतात. पण शिष्टाचारांची घडी थोडीशी मोडण्यापलीकडे त्याचा आपला संबंध जातच नाही. त्यांच्या घरी जाणे-येणे होते --- भेटणे-बोलणे होते --- पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत. आणि काही माणसे क्षणभरात जन्मजन्मांतरी नाते असल्यासारखी दुवा साधून जातात. वागण्यातला बेतशुद्धपणा क्षणार्धात नष्ट होतो. तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही. पूर्वसंस्कार, भाषा, चवी, आवडीनिवडी, --- कशाचाही आधार लागत नाही. सूत जमून जाते. गाठी पक्क्या बसतात.
बेळगावच्या कृष्णराव हरिहरांशी अशीच गाठ पडली. त्यांना सगळे लोक 'रावसाहेब' म्हणायचे. ही रावसाहेबी त्यांना सरकारने बहाल केली नव्हती. जन्माला येतानाच ती ते घेऊन आले होते. शेवटपर्यंत ती सुटली नाही. बेताची उंची, पातळ पांढरे केस मागे फिरवलेले, भाग्याची चित्रे रेखायला काढतात तसले कपाळ, परीटघडीचे दुटांगी पण लफ्फे काढल्यासारखे धोतर नेसायचे, वर रेशमी शर्ट, वुलन कोट, एका हाताच्या बोटात हिऱ्याची अंगठी आणि दुसऱ्या हाताच्या बोटांत करंगळीच्या आणि अनामिकेच्या बेचकीत सिगरेट धरलेली, तिचा चिलमीसारखा ताणून झुरका घ्यायची लकब. जिल्ह्याच्या कलेक्टरपासून ते रस्त्यातल्या भिकाऱ्यापर्यंत कुणालाही, दर तीन शब्दांमागे कचकावून एक शिवी घातल्याखेरीज गृहस्थाचे एक वाक्य पुरे होत नसे. मराठीला सणसणीत कानडी आघात आणि कानडीला इरसाल मराठी साज. साधे कुजबुजणे फर्लांगभर ऐकू जावे इतका नाजूक आवाज ! कुठल्याही वाक्याची सुरवात 'भ'काराने सुरू होणाऱ्या शीवीशिवाय होतच नसे. मराठीवरच्या कानडी संस्कारामुळे लिंगभेदच काय पण विभक्तिप्रत्यय-कर्ता-कर्म-क्रियापदांची आदळआपट इतकी करायचे की, दादोबा पांडुरंग किंवा दामले-बिमले सगळे व्याकरणवाले झीटच येऊन पडले असते. शुद्ध कसे बोलावे आणि शुद्ध कसे लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजत असेल तर समजो बापडे, पण जगाच्या दृष्टिने सारी अशुद्धे केलेला हा माणूस माझ्या लेखी देवटाक्याच्या पाण्याइतका शुद्ध होता. आवेग आवरता येणे हे सभ्यपणाचे लक्षण मानले जाते. रावसाहेबांना तेवढे जमत नव्हते. तरीही रावसाहेब सभ्य होते. काही माणसांची वागण्याची तऱहाच अशी असते. की त्यांच्या हाती मद्याचा पेलादेखील खुलतो, आणि काही माणसे दूधदेखील ताडी प्याल्यासारखी पितात. रावसाहेब षोकीन होते. पण वखवखलेले नव्हते. जीवनात त्यांनी दुर्दैवाचे दशावतार पाहिले. पण उपाशी वाघ काय आपली चाल मरतुकड्या कुत्र्याच्या वळणावर नेईल ? सोन्याच्या थाळीतून पहिला दूधभात खाल्लेल्या धनुत्तर हुच्चराव हरिहर वकिलाच्या किटप्पाने पुढच्या आयुष्यात कधीकधी शिळ्या भाकरीचा तुकडाही मोडला होता. पण काही हस्तस्पर्शच असे असतात, की त्यांच्या हाती कण्हेरदेखील गुलाबासारखी वाटते. रावसाहेबांची घडण खानदारी खरी, पण माणूस गर्दीत रमणारा. अंतर्बाह्य ब्राँझने घडवल्यासारखा वाटे. वर्णही तसाच तांबूस-काळा होता. सिगरेटचा दमदार झुरका घेताना त्यांचा चेहरा लाल आणि काळ्याच्या मिश्रणातून होतो तसा होई. मग दहांतल्या पाच वेळा त्यांना जोरदार ठसका लागे. सिगरेट ओढतानाच काय, पण जोरात हसले तरी ठसका लागायचा. कारण ते हसणेदेखील बेंबीच्या देठापासून फुटायचे. स्मितहास्य वगैरे हास्याचे नाजून प्रकार त्या चेहऱ्याला मानवतच नसत. एकदम साताच्या वरच मजले.
ह्या राजा आदमीची आणि माझी पहिली भेट कोल्हापूरच्या शालिनी स्टूडिओत पडली. दहापंधरा वाद्यांचा ताफा पुढ्यात घेऊन मी गाणे बसवीत होतो. रेकॉर्डींगच्या आधीची साफसफाई चालली होती. विष्णुपंत जोग आपल्या पहाडी आवाजात गात होते. चाल थोडी गायकी ढंगाची होती. जोगांचा वरचा षड्ज ठ्यां लागला आणि तो वाद्यमेळ आणि जोगांचा स्वर ह्यांच्या वर चढलेल्या आवाजात कोणीतरी ओरडले --- "हा__ण तुझ्या आXX!"
ही इतकी सणसणीत दाद कोणाची गेली म्हणून मी चमकून मागे पाहिले. बाळ गजबर रावसाहेबांना घेऊन पुढे आले आणि मला म्हणाले ---"हे बेळगावचे कृष्णराव हरिहर बरं काय ----"मी रीतसर नमस्कार ठोकला आणि रावसाहेबांनी आमची आणि त्यांची शाळूसोबत असल्यासारखा माझ्या पाठीत गुद्दा मारला. "काय दणदणीत गाणं हो xxxxx !" रावसाहेबांच्या तोंडची वाक्ये जशीच्या तशी लिहायची म्हणजे मुष्किलच आहे. शरीराप्रमाणे मनालाही कुबड आलेली माणसे अश्लील -- अश्लील म्हणून ओरडायची. (तबीयतदार तज्ञांनी फुल्या भरून काढाव्या.) "वा !--- पण तेवढं तुमचं ते तबलजी शिंचं कुचकुचत वाजिवतंय की हो -- त्याला एक थोडं चा पाज चा -- तबला एक थोडं छप्पर उडिवणारं वाजीव की रे म्हणा की त्या xxxxxला." इथे पाच शब्दांची एक शिवी छप्पर उडवून गेली. तसेच पुढे गेले, आणि त्या तबलजीला त्यांनी विचारलं, "कोणाचा रे तू ?" तबलजीने वंश सांगीतला. आणि माईकपुढे नरम वाजवावे लागते वगैरे सबबी सुरू केल्या. "मग रेकार्डिंगवाल्याला ह्यें माइकचं बोंडूक वर उचलायला लावू या की. बळवंत रुकडीकराचे ऐकलं नाहीस काय रे तबला ? 'कशाला उद्याची बात'चं रेकार्ड ऐक की -- त्याच्या वाटेत तुझं हे xxxचं माइक कसं येत नव्हतं रे xx?" म्हणत आपणच माइक वगैरे वर उचलून "हाण बघू आता" म्हणत त्या रेकॉर्डिंगचा ताबा घेतला. स्टुडियोत त्यांचा जुना राबता होता. रेकॉर्डिस्टही परिचयातलेच. थोडा वेळ इरसाल कोल्हापुरीत त्यांचा आणि ह्यांचा एक लडिवाळ संवाद झाला. "मला सांगतोस काय रे रेकार्डिंग? पी.एल. --- अहो, हे तुमचं रेकार्डिष्ट खुंटाएवढं होतं --- माझ्या धोतरावर मुतत होतं. आता मिश्या वर घेऊन मला शिकवतंय बघा --- ह्या कोल्हापुरातल्या क्राऊन शिन्माचा नारळ फुटला तो माझ्यापुढे की रे -- तू जन्म झाला होतास काय तेव्हा -- हं, तुमच्या वाजिंत्रवाल्यांना लावा पुन्हा वाजवायला -- जोर नाही एकाच्या xxx! हें असलं नाटकासारखं गाणं आणि साथ कसलं रे असलं मिळमिळीत ? थूः ! हे काय तबला वाजिवतंय की मांडी खाजिवतंय रे आपलंच ?" एवढे बोलून रावसाहेब ठसका लागेपर्यंत हसले. रावसाहेबांचा हा अवतार मला अपरिचित असला तरी आमच्या स्टुडिओतल्या मंडळींना ठाऊक असावा. कारण त्यांच्या त्या आडवळणी बोलण्यावर लोक मनसोक्त हसत होते. रेकॉर्डिस्टने त्यांना आपल्या बूथमध्ये नेले आणि रावसाहेब त्या काचेमागून माना डोलवायला लागले. त्या माणसाने पहिल्या भेटीतच मला खिशात टाकले.

मला मिळालेला प्रतिसाद...

मला मिळालेला प्रतिसाद...हेमंत पटील , मी आपला आभारी आहे !!

काहीही केले तरी
कामाचा व्याप कमी होत नाही
भेटीची ईछ्छा असूनही भेट होत नाही.
कामाला वहून घेतांना छंद नाहीसे झाले
करीअरमागे धावताना मित्र वीरून गेले
इन्क्रिमेंट, रेझ मागताना, आपलेसे दूर निघून गेले
मोठ्या गोष्टी मिळविअताना, छोटे आनंद निघून गेले
नीट आरशात पाहीले, तेव्हा मला दिसले,
मला कोणी खांबाला बांधले नाहीय,
माझीच खांबवरची पकड ढिली होत नाहीय.


हेमंत पटील - सुरत

Sunday, March 05, 2006

किती तरी दिवसात..

किती तरी दिवसात आपली
भेटच झाली नाही
रात्री अपरात्री घोटून
कॉफीच केली नाही

कांदे भजी खाता खाता
गप्पा रचल्या नाही
तुझ्या भावविभोर शब्दात
कविता सजल्या नाही

तार स्वरात वाऱ्यावरती
सूर फेकले नाही
काहितरी करायला पायजे
असे ऐकले नाही

भटाबिटांच्या कवितंची पण
छेड काढली नाही
सगळे मिळून 'अरे वेड्या'
'पत्र' वाचली नाही

किती तरी दिवसात लेका
तुला भेटलो नाही
शहाण्यासारखा वागत गेलो
वेडाच झालो नाही

(tushar joshi, nagpur)