Friday, February 03, 2006

एका अरबी घोड्याचा गाढवपणा !!



एकटा फिरता-फिरता एक अबलख अरबी घोडा गाढवांच्या कळपात शिरला. मग हा अश्व अकेला आपली पेडिग्री विसरला. आणि गर्दभांशी त्याची घनदाट मैत्रीही झाली. तो आपले घोडेपण विसरला हे खरे; पण गाढवांनी आपलं गाढवपण विसरलं, हे नवलच.

मग मैत्र जीवाचे लाभले म्हणून तो अगदी आनंदाने खिंकाळायला लागायचा. आणि गाढवंही आपण गाढव आहोत याचे भान हरवून अगदी अरबीत रेकायचे. गळ्याला गळा घासायचे. मग एकमेकांच्या शेपटीवर शेपूट आपटायचे. "दे टाळी" म्हणत मनुष्य प्राणी हातावर हात हात मारतो ना, अगदी तशीच. थोडक्यात, त्यांना सामाजिक समरसता सहज साधली गेली होती.

एकंदर चरता-चरता दिवस मजेत सरत होते. तो खिंकाळत होता, ते रेकत होते. हळुहळू आपल्यासोबत त्या अरबी तुरंगाला बघता-बघता हरेक गाढवाला वाटायला लागलं, "मी सुद्धा अरबी घोडा आहे." घोड्यालाही हे कधी कळलं नाही. कळून घेण्याचा त्याने प्रयत्नही केला नाही.

पण एकेदिवशी कुरणाच्या टोकावर असलेल्या पाणवठ्यावर तो एका गाढवीसोबत तहान भागवीत असताना त्याच्या जातीच्या एका घोड्याने पाहिले. नाकपुड्या फुगवत त्याने अबलखाला शिवी हासडली, "गाढव कुठला!" आणि घोड्याचे डोळे उघडले. पण एव्हाना उशीर झाला होता. गाढवं तर घोडी झाली होती आणि इतरांलेखी घोडा गाढव ठरला होता.

तात्पर्य: गाढवांबरोबर रहावे, खेचरांबरोबर रहावे. हरकत नाही. पण पाणवठ्यावर एकटे जावे.

( अतिशय मस्त अशी गोष्ट ! मला आवडली , सही .. अन्तु [an2])

0 Comments:

Post a Comment

<< Home