पुणेकर होण्यासाठी तुम्हाला कोणत्यातरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगणं आवश्यक आहे - पु. ल. देशपांडेपुलंच्या या उक्तीला अनुसरून मला लहानपणापासूनच पुण्याच्या 'खाद्य' श्रद्धास्थानांविषयी कमालीचा, शाश्वत, निरंकुश, अफाट इ इ थोडक्यात जाज्वल्य अभिमान वाटत आला आहे. थांबा. ही टायपिंग मिष्टेक नाही! मला आद्य श्रद्धास्थानं म्हणायचं नसून खाद्य श्रद्धास्थानंच म्हणायचं आहे. आणि खाद्य श्रद्धास्थानं हीच पुण्याची आद्य श्रद्धास्थानं आहेत असा माझा दावाही आहे. कारण वडा, भजी, मिसळ भेळी पासून ते पंजाबी, चायनीज, काँटिनेंटल, थाई पर्यंत अनंत प्रकारची खाद्यं अनंत ठिकाणी जाऊन मटकावणाऱ्या पुणेकरांची आद्य श्रद्धास्थानं ही केवळ खाद्यच असू शकतात!
'वदनी कवळ घेता' म्हणायच्या वयापासून ते 'वदनी कवळी येण्या'च्या वयापर्यंतचे सर्व पुणेकर आठवड्यातून एकदातरी कुठेतरी बाहेर जाऊन काही ना काही फस्त करून येतात. सलग आठवडाभर रोज सकाळ दुपार संध्याकाळ रात्र सर्व वेळ फक्त घरीच (स्वतःच्या) उदरभरण (स्वतःचं) करणारी व्यक्ती ही खरीखुरी पुणेकर असूच शकत नाही! असे हे पुणेकर नेमके कुठे जातात आणि काय काय काय मटकवून येतात याचा माझ्या नजरेनं (वा जिव्हेनं!!) शोध घ्यायचा हा प्रयत्न...
श्रद्धास्थान १ - मिसळ
पुण्याचं अत्यंत लाडकं खाद्य श्रद्धास्थान म्हणजे मिसळ! जगात मिसळीच्या दोनच प्रमुख जाती... पुणेरी मिसळ आणि कोल्हापुरी मिसळ. (अलिकडेच कुठेतरी 'चायनीज मिसळ' हा प्रकार मेनूकार्ड वाचताना समोर आला... पण अशा संकरित जातींकडे जातीचा पुणेकर जातीनं दुर्लक्ष करतो!). कोणतीही मिसळ बनवताना त्यात (स्वाभाविकतःच) अनेक गोष्टी मिसळल्या जात असल्या तरी मिसळीची चव ठरवणारा एकच प्रमुख घटक असतो. कोल्हापुरी मिसळीत या मुख्य घटकाला 'तर्री' म्हणतात तर पुणेरी मिसळीत याला 'शांपल' म्हणतात. कोल्हापुरी तर्री ही कांदा-खोबऱ्याच्या वाटणानी बनते आणि त्याची चव ही कोल्हापुरी मटणाच्या रश्शाशी बऱ्यापैकी साधर्म्य सांगणारी असते. पुणेरी मिसळीचं शांपल मात्र एक संपूर्णतः वेगळी आणि स्वयंभू गोष्ट असते. जसे पुण्यातले वेगवेगळ्या जाती-धर्मा-पंथाचे लोक पुणेरीपणाच्या एका विशिष्ट स्वभावधर्मानं एकत्र बांधलेले असतात तसं कांदा-बटाटा-टमाटोचं हे शांपल एका आगळ्या वेगळ्या स्वादानं दरवळणारं असतं!
पोहे, बटाटा भाजी, फरसाण आणि शांपलनं भरलेली आणि शेव, कांदा, कोथिंबीरीनं सजलेली ही वैशिष्ट्यपूर्ण पुणेरी मिसळ खाण्यासाठी पुण्यात तीन श्रद्धास्थानं आहेत. तुळशीबागेत 'श्रीकृष्ण', सदाशिव पेठेत 'श्री' आणि पत्र्यामारुतीपाशी 'बेडेकर'! या तीनही ठिकाणची समान वैशिष्ट्य म्हणजे - अत्यंत अपुरी, अंधारी जागा... ग्राहकांची जमेल तितकी गैरसोय... रोज लागणारा 'मिसळ संपली' चा बोर्ड!... आणि तरीही या सर्वांवर मात करणारी अत्यंत चवदार, चटकदार अप्रतीम मिसळ!
अर्थात ही तीन श्रद्धास्थानं सोडून पुण्यात इतरही अनेक ठिकाणी मिसळी मिळतात. टिळकरोड वरच्या 'रामसर' मधली नाका-तोंडातून धूर आणणारी 'ज्वलंत' मिसळ असो वा अनेक उडप्यांकडे मिळणारी 'सांबार'युक्त मिसळ... खरी पुणेरी मिसळ खाण्याची तीनच श्रद्धास्थानं... श्री, श्रीकृष्ण आणि बेडेकर!