Tuesday, February 07, 2006

सेन्सेक्स - एक गझल!

पंख आशांचे अता फैलावतो सेन्सेक्स
उंच आभाळी अता झेपावतो सेन्सेक्स

ही सुबत्तेची गुलाबी साखरी स्वप्ने
चाखण्या गोडी अम्हा बोलावतो सेन्सेक्स

भोवताली स्वर्ग अमुचे निर्मितो आम्ही
चित्र स्वर्गाचेच या रेखाटतो सेन्सेक्स

लाख लाखांच्या चुली चेतावतो सेन्सेक्स
लाख लाखांची छते शाकारतो सेन्सेक्स

फूल कोणा लाभते, काटे कुणासाठी
का मिठी कोणा, कुणा फटकारतो सेन्सेक्स?

अन कधी गर्तेत हा झेपावतो तेंव्हा
प्राशुनी कोट्यावधी थंडावतो सेन्सेक्स

ओळखावे तू तरी आता 'प्रसादा' हे
खेळ मायेचाच सारा खेळतो सेन्सेक्स

(मुंबई भाग-भांडवल बाजाराच्या निर्देशांकास 'सेन्सेक्स' असे गोंडस नाव आहे! या सेन्सेक्साने काल १०००० ची विक्रमी पातळी गाठली होती... या निमित्ताने ही गझल!)
(manogat)

0 Comments:

Post a Comment

<< Home